Friday, 12 July 2013

पंचेंद्रिये आणि अंतर्ज्ञान किंवा तात्कालिक ज्ञान

 अंतर्ज्ञान ही एक देणगी आहे असा आपल्यापैकी खूप लोकांचा समाज आहे. अंतर्ज्ञान देणारे एखादे सहावे इंद्रिय असावे असेही काहीजणांना वाटते.

आपण रोजच्या रोज बरेच निर्णय घेत असतो. काही योग्य असतात, काही अयोग्य असतात. काही चुकीचे असतात तर काही बिनचूक असतात. निर्णय चुकीचा ठरला तर त्यामुळे आपले नेमके किती नुकसान झाले त्यावर आपण केलेल्या चुकीची किंमत आपण ठरवतो.

कधी कधी आपण घेतलेल्या निर्णयामुळे आपले काही नुकसान झाले आहे हेच काहीजण  मान्य करीत नाही. अशा व्यक्ती आपल्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचे विश्लेषण करण्याच्या फांदातही पडत नाहीत.

काही व्यक्ती मात्र चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाचा नीटपणे अभ्यास करतात. समजा प्रत्यक्ष नुकसान झाले नसले तरीही आपण नेमक्या कोणत्या परिस्थितीत चुकीचा निर्णय घेतला याबाबत चिकित्सक असतात.अशा व्यक्ती कळत-नकळत आपण नेमकी कशी आणि कोणती चूक केली याचा सखोल अभ्यास करतात. अशा व्यक्ती हळू हळू नेमका आणि बिनचूक निर्णय घ्यावयास शिकतात. काही काळाने असे लक्षात येते की अशा व्यक्तींचा  कोणताच निर्णय चुकीचा ठरत नाही. त्यांचे निर्णय सहसा बिनचूक असतात. अशा व्यक्तींना काही अंतर्ज्ञान झाले कि काय किंवा काही तात्कालिक ज्ञान मिळण्याची सिद्धी प्राप्त झाली कि काय असे वाटते.

अंतर्ज्ञान ही  काही मंत्र सिद्धी नाही. किंवा असे ज्ञान देणारे कोणतेही सहावे इंद्रिय नाही.आपण घेतलेल्या चुकीच्या व बिनचूक निर्णयाचे  सतत विश्लेषण करण्याच्या साधनेमुळे मिळालेली ही अदभूत शक्ती आहे. ती आपल्याला जन्मतःच मिळालेली नसते. प्रयत्नानेच मिळते.

 कोणताही निर्णय घेत असताना आपल्याला आपल्या पाचही इंद्रियांच्या तर्फे मिळालेल्या ज्ञानाची गरज असते.  पाचही इंद्रियांतर्फे मिळाले ज्ञान संकलित रित्या मांडून त्याचा सांकल्याने विचार करून, त्याच्या साधक-बाधक परिणामांची शक्यता लक्षात घेऊन घेतलेला निर्णय सहसा चुकीच ठरत नाही. इतका की जणू असे निर्णय घेण्याची आपल्याला काही दैवी शक्तीच प्राप्त झाले कि काय असे वाटावे.

अशी साधना कोणीही करू शकते. किनालाही साधू शकते. पंचेन्द्रियांतर्फे मिळालेल्या ज्ञानाचा सर्वांगीण विचार म्हणजेच अंतर्ज्ञान. हि काही जन्मजात देणगी नव्हे.

Monday, 8 July 2013

charukalp: मोलकरीण आणि मदतनीस

charukalp: मोलकरीण आणि मदतनीस: आपल्या सगळ्याकडे घरकाम करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा  जास्त महिला नेमलेल्या असतीलच. क्वचितप्रसंगी एखादा पुरुषही असू शकेल. आपण यांना काय स...

मोलकरीण आणि मदतनीस

आपल्या सगळ्याकडे घरकाम करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा  जास्त महिला नेमलेल्या असतीलच. क्वचितप्रसंगी एखादा पुरुषही असू शकेल.

आपण यांना काय संबोधतो?

मोलकरीण? घरकामाची बाई? घरगडी?

मानसशास्त्र आणि स्वयं प्रेरणा यासंबंधी एक सिद्धांत आहे. त्याला 'वाय' सिद्धांत म्हटले जाते.
आपण समोरच्याला ज्या प्रेरणेने संबोधतो त्याच नावाने तो स्वतःला पाहतो. काही अपवाद वगळता हा सिद्धांत सर्वांनाच लागू आहे.

मोलकरीण या शब्दातच कमीपणाचा भाव आहे. आपले  घरकाम करणाऱ्या महिलेला आपण मोलकरीण म्हणणे म्हणजे मुळातच तिला कमी लेखण्यासारखे आहे. तीही तशाच पद्धतीने काम करणार. जसा दर्जा तसे काम.

याउलट आपण तिला मोलकरीण ऐवजी मदतनीस म्हणून संबोधले तर तीही मदतनीस म्हणूनच काम करेल. आपल्याला मदत करणाऱ्या महिलेला उच्च दर्जा देणे हे आपल्याच हातात आहे.

अर्थात असे केल्याने ती तिच्यात लगेचच बदल करेल असे नाही, पण हळूहळू तिच्यात हा बदल दिसून येईल. तिला मदतनीस म्हटल्याने तिला समाजातही उच्च स्थान मिळेल. या गोष्टीची जाणीव तिला आत्ता नाही तरी काही दिवसांनी नक्कीच होईल.

पहा आपल्याला जमते का. मी हि व्यवस्था गेली ३५ वर्षे व्यवहारात आणली आहे. त्याचे परिणामही उत्तमच मिळाले आहेत.

कल्पना भागवत 

Saturday, 6 July 2013

महिला आणि भांडणाचे प्रकार

महिला अणि राजकारण

दहा दिवसांपूर्वी टी व्ही बातम्यांमधे महापालिकेत महिला नगरसेविका भांडताना दाखविल्या गेल्या.
महिलांचे भांडण हा एक विनोदाचा प्रकार आहे किंवा काय अशा पद्धतीने सर्व (बघणारे आणि दाखवणारे) त्याकडे पाहत होते.

महिलांनी उच्चपद धारण करणे, त्या पदावरून काम करणे, आपल्या मुद्द्यांसाठी भांडणे, आपला मुद्दा समोरच्याला आग्रहाने सांगणे या गोष्टी सर्वाना नव्या नाहीत.

पण आपल्याकडे महिलांनी आपल्या मुद्द्यासाठी कसे भांडावे यासाठीची साचेबद्ध पद्धत नाही.
पुरुषांनी भांडताना खुर्च्या एकमेकांकडे फेकून मारल्या तर आपल्याला त्याबद्दल फारसे चुकीचे वाटत नाही. पुरुषांनी गुद्दागुद्दी केली तर त्याबद्दल फार हरकत घ्यावीशी वाटत नाही. किंबहुना पुरुषांची मर्दुमकी असल्याचा काहीजण दावाच  करीत असतील. म्हणजे पुरुषांनी कसे भांडावे याबद्दलचे काही संकेत आपण मान्य केलेले दिसतात.

महिलांनी कसे भांडावे याबद्दल मात्र तसे काही संकेत अजून रूढ झालेले दिसत नाहीत. उच्चपदावर काम करणे व आपल्या मुद्द्यासाठी भांडणे याबाबत रूढी तयर होण्याच्या दृष्टीने महिलाकरण हा नवीनच प्रांत आहे. पूर्वी महिलांना भांडण्यासाठी नळ, पाणी भरणे, भाजीबाजार, चूल-घर अशा जागा होत्या. लौकिकार्थाने त्या कमीपणाच्या मानल्या जात होत्या. त्यामुळे महिलांमधील भांडणांना नळावरची भांडणे असे म्हटले जाते.

नव्या जमान्यात त्यामुळे आता मात्र या  भांडणांना पुरुषांच्या भांडणा इतकीच प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. महिला भांडताना खुर्च्या फेकून मारणार नाहीत, शर्टाची बाही किंवा गळपट्टी पकडणार नाहीत, गुद्दागुद्दी करणार नाहीत. त्यांच्या नव्या रूढी तयार होईपर्यंत गळ्यातले मंगळसूत्र, केस, साडी, हातातली पर्स, छत्री इत्यादी गोष्टींचा वापर तिला करणे भाग आहे. पण म्हणून काही तिच्या भांडणाची तीव्रता कमी मानू नये. किंवा भांडणातल्या मुद्द्याचे महत्व कमी मानले जाऊ नये.

यात कोणीही महिलांना कमीपणा देणे बरोबर नाही. किंवा तो कमीपणा पुरुषांच्या भांडण्याच्या पद्धती इतकाच कमीपणाचा आहे. भांडण हे भांडणच आहे. पद्धत कोणतीही असो. टी व्ही माध्यमांनी याचा विचार करावा.