Monday, 8 July 2013

मोलकरीण आणि मदतनीस

आपल्या सगळ्याकडे घरकाम करण्यासाठी एक किंवा एकापेक्षा  जास्त महिला नेमलेल्या असतीलच. क्वचितप्रसंगी एखादा पुरुषही असू शकेल.

आपण यांना काय संबोधतो?

मोलकरीण? घरकामाची बाई? घरगडी?

मानसशास्त्र आणि स्वयं प्रेरणा यासंबंधी एक सिद्धांत आहे. त्याला 'वाय' सिद्धांत म्हटले जाते.
आपण समोरच्याला ज्या प्रेरणेने संबोधतो त्याच नावाने तो स्वतःला पाहतो. काही अपवाद वगळता हा सिद्धांत सर्वांनाच लागू आहे.

मोलकरीण या शब्दातच कमीपणाचा भाव आहे. आपले  घरकाम करणाऱ्या महिलेला आपण मोलकरीण म्हणणे म्हणजे मुळातच तिला कमी लेखण्यासारखे आहे. तीही तशाच पद्धतीने काम करणार. जसा दर्जा तसे काम.

याउलट आपण तिला मोलकरीण ऐवजी मदतनीस म्हणून संबोधले तर तीही मदतनीस म्हणूनच काम करेल. आपल्याला मदत करणाऱ्या महिलेला उच्च दर्जा देणे हे आपल्याच हातात आहे.

अर्थात असे केल्याने ती तिच्यात लगेचच बदल करेल असे नाही, पण हळूहळू तिच्यात हा बदल दिसून येईल. तिला मदतनीस म्हटल्याने तिला समाजातही उच्च स्थान मिळेल. या गोष्टीची जाणीव तिला आत्ता नाही तरी काही दिवसांनी नक्कीच होईल.

पहा आपल्याला जमते का. मी हि व्यवस्था गेली ३५ वर्षे व्यवहारात आणली आहे. त्याचे परिणामही उत्तमच मिळाले आहेत.

कल्पना भागवत 

No comments:

Post a Comment