मामाची बस, ट्रीप आणि
थालिपीठ (कल्पना चारुदत्त – 10 जुलै 2019)
69 – 70 सालातली गोष्ट. विजयमामानं बस घेतली, बस घेतली ही बतमी पुण्यतल्या आमच्या सर्व
नातेवाईकंमधे भर्र्कन पसरली. कोणी कोणाला आधी सांगितलं, कोणी कोणाला नंतर सांगितलं या चर्चा चालल्या
होत्या, तोवर विजयमामाच
घरी येऊन पोचला. म्हणाला, “सुधा, मी बस घेतलीये, काय, तू ऐकलंच असणार.” आई हं म्हणून गालातल्या गालात हसली. म्हणाली, “काम काय ते सांग.”
“सगळ्यांना घेऊन ट्रीप काढायची म्हणतोय, काय.” आईनं परत तेच विचारलं, काम काय ते सांग आधी. विजयमामानं आम्हा चौघाही
मुलांची चौकशी केली. हा मामा तसा आमचा फार फार आवडता मामा होता. बस त्याने घेतली
होती, आम्ही अजून
पाहिलीही नव्हती, पण काहीतरी मस्तच
असणार असं वाटून आमची मनं उत्साहीत झालेली होती. मग मामा पुढं म्हणाला, “हे बघ, आपण सगळी मिळून माझ्या बसमधून एक ट्रीप काढूयात.
तू थालिपीठ करून घे.” “फक्त? आणि जेवणाचं
काय?”
“त्याचं सोड तू. ती झालीय सोय. आचारी आहेत बरोबर.
थालिपीठ तुझ्याशिवाय अणि कोणाला जमणार? आपण सगळी हां, अगदी भाऊ आणि
शालीसुद्धा. रविवारी हां! समजलं?” आईनं काहीही
विचार न करता पट्कन होकार दिला. आपण सगळी म्हणजे पुण्यातले सगळे नातेवाईक. किमान
30-40 जण तरी होते. चहा-पाणी-गप्पा झाल्या. खुशीत मामा निघून गेला.
तो गेल्या गेल्या आईनं वरच्या फळीवरचे दोनही मोठे
टोप खाली काढले.
हे आमचं थालिपीठ प्रकरण फार वेगळं असतं. उत्सवच
म्हणाना! आईनं शेजारच्या कासटच्या दुकानातून दोन-तीन किलो तांदुळ आणले. दोन-तीन
नारळ आणले. एका बाजूला आमच्याशी काहीबाही बडबडतही होती. त्यादिवशी बडबड करून माझी
लाज काढू नका. हे वाक्य खास माझ्यासाठी. दंगाबिंगा तर अजिबात करायचा नाही. पेटीतले चांगलेसे कपडे काढून ठेवा. खरंतर पेटीत
ठेवणीतले असे दोन-तीनच कपडे असायचे. आम्ही चार भावंडं. परीस्थिती बेताची. शिवाय
त्यावेळीही पैसेवाल्यांकडे काही फार कपडे असायचे असं नाही. असो! अशा तिच्या सुचना
तीन-चार दिवस चालु होत्या. एका बाजूला तिचे हात थलिपीठाच्या दिशेने काम करत होते.
दुसर्या दिवशी तिनं दोनेक किलो तांदुळ धुवून स्वच्छ पंचावर पसरून ठेवले. ते न
लाथाडण्याबद्दल आम्हाला तंबी देऊन ठेवली. शनिवार उजाडला. सकाळची शाळा. आम्ही शाळेतून
घरी आलो तर आईनं जातं मांडून ठेवलेलं. आम्हाला समजूनच गेलं की आता पुढं मज्जाच
आहे. उत्सव सुरू झाला. आईनं धुतलेले तांदुळ कणीदार दळून काढले. संदिपला कोळसे
आणायला पळवलं. खरंतर ती कधीच शनिवारी कोळसे आणीत नसे. पण विजयमामा, बस, ट्रीप आणि थालिपीठ अशा सगळ्याच गोष्टींवर तिचं अतीव प्रेम! मला संगितलं
आणि मी लगेच कॉट्खालून शेगडी काढली. माझ्याकडून कांदे चिरून घेतले दोनेक किलो तरी
असतील. दोन नारळ फोडले. स्वतः विळीवर खोबरं खवलं. एका ताटात 20-22 लवंगा, त्याच्या जरा चढत्या प्रमाणात मिरी, दलचिनी, धणे, बडिशेप, खसखस, लसूण, आणि त्याच्याबरोबर खवलेल्या खोबर्यामधलं (दोन
नारळ) थोडं खोबरं हे सगळं मंद मंद भाजून काढलं. मला बसवलं पाट्यावर वाटायला.
भाजलेला मसाला आणि उरलेलं खवलेलं खोबरं. तेव्हा मिक्सर-बिक्सर असलं काही नव्हतं.
वाटण गंधबारीकच हवं. एका बाजूला तिनं थोड्या काजूचे वाटीभर तुकडे करून घेतले.
नारळाच्या एका वाटीतून खोबर्याचे तुकडे काढले. ते विळीवर अगदी बारीक चिरून घेतले.
दीडेक वाटी गूळ चिरून ठेवला. अर्धी वाटी चिंच भिजवली. एव्हढं होईस्तो रात्रीचे आठ
वाजून गेले होते. स्टोव्हवर मोठा टोप चढवून ती लागली शेगडीच्या मागे. शेगडीची
पूर्वतयारी माझ्याकडे सोपवून तापलेल्या टोपात जरासं तेल टाकून ते तापल्यावर त्यात
कांदा टाकला. कांदा जरा जरा भाजल्यावर त्यात तिनं दळलेल्या तांदुळकण्या टाकल्या. भरपूर
हळद आणि मीठ टाकलं. परतताना सरासर वाफा यायला लागल्या तसं तिनं त्यात जितक्यास
तितकं आणि वर जरा जास्त इतकं उकळतं पाणी टाकलं. झाकणी ठेऊन जरा वाफ आणली. कणी दोन
बोटात दबून पाहिली. मऊ झालेली होती. मग त्यात वाटलेला सगळा मसाला घेऊन त्यात
भाजलेल्या लाल मिरचीची पूड दोनेक वाट्या (कारण हे थालीपीठ खूप तिखट होणं हे त्याचं
खास वैशिश्ट्य.) घालून नीट कालवून,
थोडं पाणी घालून ते मिश्रण सरसरीतसं करून शिजवलेल्या तांदुळकण्यांमधे टाकून, काजू तुकडे आणि खोबर्याचे बारीक चिरलेले तुकडे घालून, चिंच-गूळ त्यात मिक्स करून मस्त परतून घेतलं. वरती मोठं ताट ठेऊन ताटात
पाणी ओतलं. स्टोव्ह जरा जरा वेळानं मंद केला. तो टोप खाली उतरवला आणि त्याच्यावर
दुसरा टोप ठेऊन त्यात भरपूर तेल टाकलं. खूप तापल्यावर मूठभर मोहरी टकली, तडतड्ल्यावर स्टोव्ह बंद करून त्यात मूठभर जिरे टकले. फोडणी थोडी थंड
झाल्यावर निम्मी एका वाटीत काढून घेतली. फोडणी असलेल्या टोपात शिजवलेलं सगळं
मिश्रण निगुतीनं ओतलं. थारवल्यावर उरलेली वाटीतली फोडणी वरती नीट पसरून टाकली.
इकडे तोवर तिच्या मदतीने मी शेगडी मस्त फुलवलेली
होती. शेगडी एका कोपर्यात ठेवली. टोपावर ठेवायच्या ताटात निम्म्याहून अधिक फुलवले
कोळसे ठेवले. परत शेगडीत कोळसे भरले. आणि थालिपीठबुवाचा टोप त्यावर ठेवला.
त्याच्यावर कोळशांनी भरलेलं ताट ठेवलं. ताटावरच्या फुललेल्या कोळशात मधेमधे कांडी
कोळशाचे छोटे छोटे तुकडे पेरून ठेवले. साईबाबा पाव रे बाबा, सगळं नीट होऊंदे
रे बाबा, असं म्हणून हात जोडले. एव्हाना रात्रीचे अकरा तरी
वाजून गेले होते. आम्ही मुलं बराच वेळ बड्बड करत बसलो होतो. आई कधी झोपली कोण
जाणे!
सकाळी उठ्लो तर आई आंघोळ वगैरे करून तय्यार. मधेच
तिनं बाबांनाही तयार व्हायला बजावलं. आमचं आवरेस्तो आठ वाजून गेले होते. ट्रीपचं
ठिकाण होतं पुण्याजवळचं बनेश्वर, नसरापूर. मामा आला, आईला हाक दिली. अलगद थलिपीठाच्या पातेल्याजवळ आला. त्याच्यावरचं ताट
काढलं. जरा वाकून वास घेऊन पाहिलं. “अरे सुधा, व्वा, व्वा! सुंदरच गं! अरे संदीप, जा लवकर, त्या ---“ संदीप जाग्यावर नव्हताच. बस, ट्रक
यांच्यातच कायम रमणारा संदीप बसकडे कधीच पळाला होत. मी गेले आणि बसमधल्या त्या दोन
आचारी नामक काकांना घेऊन आले. मामा आणि त्या दोघांनी मिळून थालिपीठबुवांना अलगद
उचलून बसच्या पुढच्या भागात चादरीची एक चुंबळ करून त्यावर ठेऊन टाकलं. दबक्या
आवाजात दंगा गड्बड करत, आई डोळे वटारुन (आधीच तिचे डोळे मोठे
त्यात आम्ही तिला न आवडणार्या गोष्टी केल्या तर ती ते वटारून आम्हाला खाणाखुणा
करून दंगा न करण्याबद्दल बजावते) बघत नाहिये ना असं बघून ढकलाढकली करून बसमधे
बसलो. बाबा आमच्या मागे बसमधे आले आणि मामाच्या शेजारी जाऊन बसले. आई बसमधे
चढल्याबरोबर आधी तिच्या थालिपीठाकडे जाऊन प्रेमानं त्याच्याकडं पाहून आली. तिनं
साईबाबा साईबाबा जप सुरू केला आणि बस सुरू झाली.
पहिला थांबा सीटीपोस्ट. तिथं भाऊमामा, मामी आणि
त्यांची तीन मुलं आली. मग फडके हौद. तिथं विजयमामी,
विजयमामाची तीन मुलं, आणखी तीन मामा,
मामी आणि त्यांची मुलं. तिसरा थांबा रास्तापेठ. तिथं बाकीचे सगळेच बसमधे आले आणि
बस भरूनच गेली. सगळा दंगा, बड्बड,
गड्बड, मुलांचा आरडाओरडा. कोणाच्याच आयांचं त्यांच्या
मुलांकडे लक्ष नव्हतं. मामा, माम्या,
मावशा, काका वगैरे मंडळी त्यांच्या त्यांच्या गप्पांमधे
रंगून गेली.
कात्रजचा घाट उतरून बस जरा पुढं आली आणि ठ्ठॉम्म असा
मोठा आवाज करत बंद पडली. आधी मामा खाली उतरला, मग
ड्रायव्हर, मागून संदीप आणि इतर मामावगैरे मंडळी उतरली.
काहीतरी खाट्खुट केलं. बसचा रुसवा जाईना. आत बायकांचा आणि
उरलेल्या बारक्या मुलांचा दंगा. मी मागच्या खिडकीतून पहाते तो पुरुषमंडळी चक्क बस
ढकलत होती. एकदम फार्र-फार्र करत बस सुरू झाली. सगळे जसजसे बसमधे चढले तसतसे
मोठ्या मंडळींचे आवाज वाढत गेले. विजयमामानं टूम काढली की सगळ्या जोडप्यांनी
शेजारी शेजारी बसायचं. बारकी मुलं त्यांच्या त्यांच्या नादात. मोठी मुलं जे काय
चाललंय ते निगुत ऐकत होती. आमच्यासारख्या भोचक आणि अर्धवट वयातली आम्ही तिघं-चौघं
उत्सुकतेने काय चाललंय ते आपलं लक्ष नाही असं भासवत चोरून चोरून पहात-ऐकत होतो.
भाऊमामा आधीच मामीच्या जवळ बसला होता. आम्ही पुणेकर भावंडं मामा-मामीला
विजयमामा-विजयमामी, भाऊमामा-भाऊमामी,
अप्पासाहेबमामा-आप्पासाहेबमामी असं म्हणायचो. कोणी शिकवलं कोण जाणे! मामीमंडळींची
नावं आम्हाला ठाऊकच नव्हती. त्याच्यावर थट्टा-विनोद झाले. हळूहळू सगळी जोडपी एकत्र
बसली, फक्त आमचे आई-बाबा सोडून. विजयमामानं आईला ऊठून
बाबांच्या शेजारी बसायला सांगितलं. माझ्या भावंडांना कळत होतं की नाही कोण जाणे, पण तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर अगदी कोरला गेलेला आहे. केतकी-गोरी आमची
आई गालाला सुंदर खळ्या, कुरळ्या केसांच्या दोन-तीन छोट्याशा
बटा, डोळे अर्धे मिटलेले, ओठ किंचित
वाकडा करून तिचं हसणं – लाजून का काय म्हणतात तसं! सगळ्यांनीच आग्रह केला आणि ती
हळूच उठली आणि बाबांच्या शेजारी संकोचून बसली. प्रत्येक जोडप्यावर विनोद चालले
होते. आम्हाला काही कळत होते, काही कळत नव्हते. ऐकत मात्र
होतो. बनेश्वरसाठी बस फाट्यावर वळली आणि परत बंद पडली. पुन्हा तेच. बस ढकल्णे इ.
इ. मुलं मात्र एव्हाना प्रचंड रंगात आली होती. माम्या आईला थालिपीठाबद्दल विचरत
होत्या. काहीजणी एकमेकात कुजबूज करत बसल्या होत्या. मामा-काका काय विषयांवर बोलत
होते कोण जाणे. एकदची बस बनेश्वरला पोचली. मुलांना उतरायची भयंकर घाई. एकामेकांना
ढकलत-ढुकलत उतरली. कोणीतरी रडलं, पण त्याच्या आईला पत्ताच
नव्हता. किती वाजले होते कोण जाणे. आचारी आणि मामानं मिळून मोकळी जागा शोधली. दगड मांडून
चूल लावली. सगळ्यांना भूक लागलेली होती. “अरे ते थालिपीठ कुठे हे? काढा ना आता. चला गं सुधा, काय नुसतं वासासाठी
ठेवलंय की काय? अशी शेरेबाजी सुरू झाली. आई उठली. मावशीला
घेतलं बरोबर. मामाही आला. त्या पातेल्यावरचं ताट एका चटईवर खाली ठेवलं. तिघांनी
पातेल्याला हात लावला, एकानं वरती काठाला, दोघांनी पातेल्याच्या तळाला. सगळ्या देवांची नावं घेतली. उचललं. हळूच
त्याचा काठ ताटाला टेकवला आणि पटकन पातेलं उपडी केलं. उपडी केलेलं पातेलं तळाला
तिघांनी धरून परत इंचभर उचललं आणि जरा जोरात ताटावर आपटलं. आई सतत साईबाबाचं नाव
उच्चारत होती. अखेरीला पातेलं पूर्ण उचललं. एकदम तो बुवा प्रगटला. थालिपीठ्बुवा. सुंदर
पातेल्याच्या आकाराचा तो एक मोठ्ठा केकच, फक्त तिखट. वरती
फोडणीयुक्त तांबूस रंगाची खरपुडी. खालच्या बाजूला पण नक्की असणार. वर आणि खाली
ठेवलेल्या कोळशांची करामत. “अरे, पण कोयता आणलाय का?” हा ठोकळा कापायला कोयताच हवा होता. आईनं अर्थातच आणला होता. झक्क काळा, पण धारदार. तिनंच अलवार त्याला मधोमध कापला, एकमेकापासून
अलग केला. बशीजोगे लहान लहान लांबट चौकोनी तुकडे केले. तळालापण सुंदर तांबूस
रंगाची खरपुडी होतीच. आचारीकाकांनी तोवर मस्त गरम गरम चहा बनवला. सगळे पाण्याचे
पेले काढून प्रत्येकाला त्यात ओतून दिला. एकेक जण उठून थालिपीठकडे जाऊन एकेक तुकडा
घेऊन एका हातात चहा आणि एका हातात थालिपीठ खाताना दिसत होते.. पोरासोरांसकट सगळ्यांनी
नाकानं सू सू आवाज करत, तोंडाने स्स स्स आवाज करत, नाक आणि डोळ्यातून पाणी गाळत थालिपीठावर यथेच्छ ताव मारला. विजयमामानं
शेवटी ताट चाटून पुसून खाल्लं. मिळेल त्या पदराला, फडक्याला, किंवा आपापल्या कपड्यांना मुलांनी हातांची सफाई केली. गेली सगळी
हुंदडायला. बायकांना स्वैंपाकाचं वगैरे काहीच काम नव्हतं. पुन्हा एकत्र, दोघा-तिघात. चार-चौघात अशा गप्पा-गॉस्सिप सुरू झाले. विजयमामाच्या
बसबद्दल बरंच कौतुक, जरा चेष्टा, काही
खवचट, काही कुचकट बोलून झालं.
यथावकाश जेवणं झाली. बराच वेळ माम्या-मावशा
सुस्तावल्या होत्या त्या चटाचट कामाला लागल्या. साडेचार वाजून गेले. मुलं खेळून
दमली. आपापल्या आयांच्या जवळ येऊन बसली. चला-उठा असं सुरू झालं. सगळं सामान बसच्या
दिशेने निघालं. सगळ्यांनी थालिपीठ आवडीनं खाल्लं आणि संपवलं म्हणून आई खुशीत होती.
बसचा ड्रायव्हर आधीच बसमधे बसून बस सुरू करून आमची वाट बघत बसला होता. सगळे बसमधे
बसले. बस सुरू झाली. आमच्या आईचा साईबाबाचा जप सुरू झाला. बस छान चालली होती.
सातारा-पुणे रोडला लागली. जरा पुढे आली आणि प्रचंड मोठ्ठा आवाज करून थांबली. बंद
पडली. सकाळसारखा कार्यक्रम सुरू झाला. बस ऐकेचना. यावेळी सगळ्यांना खाली उतरवलं.
बस ढकलली. जेमतेम 10-12 फूट पुढे जायची आणि थांबायची. तिनं असहकारच पुकारला.
बसमधून परत सतरंज्या वगैरे काढल्या. रस्त्याकडेला चांगलीशी जागा बघून अंथरल्या. बस
बंद पडली की मोठी माणसं गंभीर व्हायची. मुलं चेकाळायची. मज्जाच वाटायची त्यांना.
रस्त्याच्या पलिकडे वडाची खूप झाडं होती. त्यांच्या पारंब्या मुलांना – अगदी
माझ्यासकट – खुणावत होत्या. भराभर मुलांनी रस्ता ओलांडला. आयांचा विरोध एव्हाना
कमी झाला होता. मला आठवतं तसं त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहतूकही नव्हती. तास हो
ऊन गेला. मुलं पडली, रडली, खेळून दमली.
आयांच्याकडे परतली. पेंगुळ्ली. मामा वगैरे लोक काय करत होते
कोण जाणे!. अंधार पडायला लागला. आणि एकदम बस सुरू झाल्याचा आवाज झाला. सगळे बसमधे
आले. बसचा आवाज सोडून सगळं गपगार झालं होतं. त्यानंतर मात्र कुठेच बंद न पडता बसनं
सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडलं. सर्वात शेवटी आमचं घर. सगळे दमले होते.
आई मात्र घरी पोचल्या पोचल्या एकदम उत्साही झाली. मामाशी खूप बोलत बसली होती. एका
बाजूला आमचा स्वैंपाक. मामाला चहा दिला. मामाचं खूप कौतुक केलं. म्हणाली,” इतकं धाडस तर आपल्यात आतापर्यंत कोणीच केलेलं नाही.” मामा निघण्यासठी
उठला. दरवाजातून बाहेर पडता पडता म्हणाला, “सुधा, बसचं सोड, अरे, थालिपीठ काय
सुंदर झालं होतं गं” अधाशासारखं खाल्लं सगळ्यांनी. आता ट्रीप नाही, पण खास तुझ्या थालिपीठाचा कार्यक्रम नक्की करायचा.” आई मागे वळली. मला
वाटलं की तिच्या सुंदर मोठ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.