Tuesday, 4 September 2018

विवेकवाद
आभाळ का पडत नाही?
गोष्ट आहे विनोबांची.  आज तीव्रतेने आठवण झाली. ऐका –
एका गावातल्या एका तरूणाला एकदा प्रश्र्न पडला की डोक्यावरच्या या आभाळाला टेकू द्यायला खांब नाहीये, पण मग ते पडत कसं नाही?
या प्रश्र्नाने त्याच्या मनात घर केलं. त्याची तहान, भूक, झोप, शांती आणि इच्छाशक्ती हरवून गेली. साधू-संत, देवऋषि-महर्षि, गुरूजी-पुजारी आणि सर्व देवभक्त सर्वांना विचारून झालं. कोणालाच उत्तर ठाऊक नव्हतं.
एकदा त्या गावात एक अवलिया आला. दिसत होता भिकारी, पण तेजस्वी! गवकरी म्हणाले ‘जा त्याला विचार तुझा प्रश्र्न’. हा गावकरी गेला त्याच्याकडे.
म्हणाला “तुम्ही देव पाहिलाय का हो? ह्या आभाळाला खांब नाहीये आणि तरी ते कोसळत नाहीये आपल्यावर. सगळे म्हणतात की ते देवानं पेललंय. मला तर बुवा हा देव काही मला भेटला नाही की कोणाला दिसला नाही. तुम्ही इतके हुशार दिसताय, मला एव्हढं उत्तर द्या की.”
अवलिया गालातल्या गालात हसला. त्याला उत्तर ठाऊक होतं. पण ते उत्तर मिळवण्यासाठी एक कठोर परीक्षा द्यावी लागणार होती. गावकरी तयार झाला. अवलिया म्हणाला “उद्या सकाळी लवकर उठ. हातात वाडगा घे. प्रत्येक घरात भीक माग. पण एक अट आहे. कोणतंच घर वगळायचं नाही. घरासमोर उभा राहून हाक मारायची. घरातलं जे कोणी बाहेर येईल त्याला जोरजोरात येतील त्या शिव्या द्यायच्या. हात उगारायचा नाही. सगळी घरं संपली की काय काय घडलं ते मला जसंच्या तसं सांगायचं. परीक्षा कठीण आहे. पूर्ण केलीस तर आभाळ कोणी पेललंय ते कळेल.”
गावकरी अचंबित झाला पण उत्तराची आशा इतकी प्रबळ होती की तो तयार झाला. सकाळी लवकर निघाला. पहिल्या घरासमोर उभा राहून “जरा खायला दे गं माऽऽऽय”, अशी हाक दिली. मायमाऊली हातात भाकरी घेऊन बाहेर आली. या पठ्ठ्यानं शिव्या द्यायचं काम सारू केलं. त्या माऊलीनं त्याला बेदम चोपून काढलं. आणि हाकलून दिलं. बिचारा! तसाच पुढं गेला. उत्तर हवं होतं ना! गावातल्या प्रत्येक घरात हेच घडलं.
मार खाऊन अर्धमेला झाला. अंगावरचे कपडे फाटले. अंधार पडायला लागला. पोटातली भूक सहन होईना. परत निघाला. वाटेत एक मिणमिणता दिवा दिसला. एक झोपडं दिसलं. वाटलं बस्स आता. आता मार खायची हिम्मत नाही. ऐनवेळी अवलियाचा चेहरा आठवला. उत्तराची अपेक्षा वाढली. पाय ओढत ओढत झोपडीपाशी आला. हाक मारली. एक म्हातारी बाहेर आली. यानं शिव्यांची लाखोली सुरू केली. मार खायच्या तयारीत तिच्याकडे बघत होता. तेव्हढ्यात ती म्हातारी पुढं आली. त्याच्या दंडाला धरलं. म्हणाली “अरे येड्या, दमलेला दिसतुयस, जरा आत ये, बस, पाणी पी, भाकरी न् भाजी खाऊन घे. मग काय त्या शिव्या दे.”
गावकरी रडू लागला. खाण्याआधीच त्याचं पोट भरलं होतं. नंतर शिव्या द्यायचं तो विसरून गेला. त्या अवलियाकडे परत जायला निघाला. मनात म्हणाला ‘एव्हढं सगळं झालं पण तो देव किंवा आभाळाला पेलणारा कोणी भेटला नाही.’
अवलियाला सर्व कथा इत्यंभूत सांगितली.
अवलिया म्हणाला, “बाळा, तुझी दृष्टी अधू झालीये. ती म्हातारी आहे ना, ती म्हणजे विवेकाचं प्रतीक आहे. तिनं नुसतं बोट लावलंय आभाळाला. त्यामुळे ते पडत नाहीये. तिच्यात तुला देव दिसेल नीट पाहिलस तर!”


No comments:

Post a Comment