Saturday, 14 July 2018

हिंदू राज्य म्हणजे काय? नरहर कुरूंदकर

"हिंदुराज्य म्हणजे काय?" - हा प्रश्न हिंदुत्ववाद्यांना एकदा विचारला पाहिजे. भारतीय संविधानात स्मृतींच्या कायद्याविरोधी कोणताही कायदा असणार नाही व जो कायदा स्मृतींच्या विरोधी जाईल, तो कायदा रद्दबातल होईल, असे कलम समाविष्ट करण्यास हिंदुत्ववादी तयार आहेत काय? धर्मशास्त्राप्रमाणे हिंदुराज्य करायचे, तर स्त्रियांचे समानतेचे हक्क रद्द केले पाहिजेत. अस्पृश्यांचे सगळेच हक्क रद्द करून त्यांना शिक्षणबंदी केली पाहिजे. जातीजातींना आपापसात विवाह करण्यास बंदी केली पाहिजे आणि राजसत्तेने ब्राह्मण अवध्य मानला पाहिजे. असल्या प्रकारची हिंदु-धर्मशास्त्राला अनुसरणारी राज्यरचना हिंदुत्ववादींना मान्य आहे काय? कारण खऱ्या अर्थाने हिंदुराज्य म्हणजे हिंदू प्रजेची संविधानाने स्वीकारलेली व पुरस्कारलेली गुलामी! इस्लामिक स्टेटची कल्पना याहून निराळी नाही. इस्लामिक स्टेट बिगरमुसलमानांना अधिकार देत नाही, हे केवळ अर्धसत्य झाले. इस्लामिक स्टेट धर्मशास्त्राप्रमाणे मुसलमानांनाही अधिकार देत नाही. अधिकार फक्त धर्मपंडितांचे  उलेमांचे; व हेही अधिकार निरपवाद नाहीत. ते मुस्लिम धर्मशास्त्राला सापेक्ष आहेत. हिंदुराज्य म्हणजे हिंदूंची गुलामी, मुस्लिम राज्य म्हणजे मुसलमानांची गुलामी, मग इतरांची गुलामी त्या (दोन्ही प्रकारच्या) राज्यांत अंतर्भूत आहेच.हे सत्य पाहूनही हिंदुराज्याची कल्पना स्वीकारार्ह वाटणार आहे का?

  - नरहर कुरुंदकर [`जागर' (१९६९) पृ १७३]

No comments:

Post a Comment